प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांमध्ये प्रामुख्याने शेतकरी व ग्रामीण कारागीर यांचा सहभाग असतो. सभासदांमध्ये बचत व परस्पर मदतीला चालना देणे, त्यांच्या कर्जविषयक गरजांची पूर्तता करणे, पतपुरवठ्यांशी संलग्न अशा निविष्ठा पुरविणे, शेतमालाची साठवणूक आणि मार्केटिंग या सुविधा पुरविणे हा या संस्थांचा प्रमुख उद्देश आहे.
या संस्थांमार्फत सभासदांना संगणकीय तंत्रज्ञानाच्या विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांना सक्षम बनविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही बाब विचारात घेऊन, देशातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या धर्तीवर स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र शासनाने प्राथमिक ‘कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण’ या योजनेस मान्यता दिली असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सदर योजना राज्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे.
